कोथूर्णे येथील हत्येतील आरोपीस फशीची शिक्षा

352 views

आरोपीच्या आईला ७ वर्षे कारावास


Author : Admin
Publisher : Admin
Update : 8 months ago
Date : Sun Mar 24 2024

image..

मावळ :- मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या निरपराध मुलीचे २ ऑगस्ट २०२२ रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. २ ऑगस्ट २०२२ रोजी म्हणजेच बरोबर १९ महिन्यांपूर्वी ही काळीज सुन्न करणारी घटना घडली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज शुक्रवारी (दि. २२) रोजी शिवाजीनगर (पुणे) सत्र न्यायालयात पार पडली.


या सुनावणीकडे गावकऱ्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या सुनावणीत हे प्रकरण निकाली काढताना न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मी हा गुन्हा केलाच नाही, असे तो सांगत होता. मात्र विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगत आरोपी तेजस महिपती दळवी (वय २६) याला फाशीची तर पुरावा नष्ट करण्यात साथ देणारी त्याची आई सुजाता महीपती दळवी (वय ४८) हिला सात वर्षांच्या सक्तीच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, या निकालाचे राज्यात सर्वत्र कौतुक केले जात असून यावर मावळवसीयांनी 'भगवान के घर देर है, अंधेर नहीं' अशी प्रतिक्रिया दिली.


कोथुर्णे (ता. मावळ) गावातून ७ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार (दि. २ ऑगस्ट २०२२) रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घडली. याबाबत पीडित बलिकेचे वडील यांनी कामशेत पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला होता. रात्रभर शोधमोहीम राबवत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात आला. परंतु ती कुठेच आढळली नाही.


दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार (दि. ३) रोजी सकाळी या बालिकेचा गावातील जि. प. शाळेच्या मागे निर्जनस्थळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर श्वानपथकाच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. व संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी तेजसने पीडितेचा खून केल्याची कबुली दिली. व या गुन्ह्यात त्याच्या साथीदार आईला देखील अटक करण्यात आली. त्यांच्यावर कलम ३६३, ३७६, ३७६ ए, ३७६ एबी, ३०२ आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम चार व पाचनुसार गुन्हा सिद्ध झाला. पोलीस निरीक्षक संजय जगताप , पोलीस हवालदार अजय दरेकर,अमलदार जितेंद्र दीक्षित यांसह कामशेतक पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.


विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. चिमुकलीला आरोपीसोबत पाहणारी गावातील महिला, मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घर झडतीच्यावेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या निवाड्याचे दाखले दिले, तसेच दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ एबी तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला 'डेथ पेनल्टी' देण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.


आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते, तसेच हातात सुरा असलेले फोटो तो समाजमाध्यमांवर टाकायचा. घटनेच्या दिवशी आरोपीने घराशेजारी खेळत असलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविले आणि बलात्कार केला. त्याला विरोध केल्याने आरोपीने चिमुकलीचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला मोहरीत टाकले. मात्र, तिचा आवाज आल्यावर आरोपीने चाकूने तिच्या गळ्यावर चार वेळा वार करून तिचा निघृण खून केला. तिचा मृतदेह पोत्यात टाकून घराच्या पाठीमागे पुरला. त्यावर फांद्या लावून त्याने गावातून पुण्याच्या दिशेने पोबारा केला. दुसऱ्या दिवशी तो थेट कामावर निघून गेला. मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडलाच.


पीडित चिमुरडीचे वडील :- मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास होता. आरोपीला फाशी शिक्षा सुनावल्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या मुलीला न्याय मिळाला. आरोपीच्या आईला देखील जन्मठेपेची शिक्षा होणे गरजेचे होते. जेणेकरून यापुढे कुठलीही आई असे कृत्य करणाऱ्या मुलाला पाठीशी घालणार नाही. तसेच प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत जाहीर केली वाचा ती. परंतु त्यांच्याकडून अद्यापही कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही.


हा गुन्हा अत्यंत संवेदनशील होता. हे लक्षात घेऊन, कामशेत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी बारकाईने तपास करून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली. त्यामुळे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली. पोलिसांच्या कामगिरीला यश आले.
- सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस अधीक्षक,


पोलीस निरीक्षक संजय जगताप:- तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने तपास केला व नागरिकांनी देखील तपास कार्यात पोलिसांना सहकार्य केले. या निकालामुळे गुन्हेगारीला चाप बसेल.