329 views
..
वडगाव मावळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना मावळ तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. सखाराम कुशाबा दगडे (वय ५२, तलाठी, सजा करूंज, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वडगाव मावळ येथील तहसील कार्यालया मागील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सोमवारी (दि.१८) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आरोपी दगडे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना दगडे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.