1042 views
अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची कामशेत येथील जुगार अड्ड्यावर धडक कारवाई. कारवाईमध्ये रोख रकमेसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डा चालविणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा नोंद
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काही इसम अवैधरित्या जुगार अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत.
त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी आज दिनांक 18/02/2024 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता कामशेत/ खडकाळे येथील नाणे रेल्वे गेट जवळील बाळकृष्ण शांताराम शिंदे यांचे मालकीचे खाजगी जागेवरील बंदीस्त खोलीमध्ये पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण 10 इसम ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा एकूण 11,43,470 रू.(अक्षरी अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पो.कॉ रहिस मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 10 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन चे पोसई शुभम चव्हाण करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ रहिस मुलाणी यांचे पथकाने केली आहे.