605 views
आमदार शेळके यांनी मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय
*विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला शब्द*
तळेगाव दाभाडे, 10 सप्टेंबर -
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियोजित रिंग रोडमध्ये बाधित होत असलेल्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील शेतकऱ्यांना दीडपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त 68 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करून इंदोरीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. आमदार शेळके यांच्या निवासस्थानी इंदोरीच्या शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संपादित जमिनींचा अतिरिक्त मोबदला देण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला होता.त्या संदर्भातील आदेश काढून त्यांनी आपला शब्द पाळला आहे.
उपविभागीय (प्रांत) अधिकारी सर्व संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांना नव्या मोबदल्याबाबत उल्लेख असलेल्या नोटिसा बजावून त्यांच्याकडून त्यासाठी संमती पत्र घेऊन या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करतील, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
इंदोरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबरोबरच रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागून त्या कामास गती प्राप्त होईल, असे शेळके यांनी सांगितले.
शासनाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलेला संपादित जमिनीचा मोबदला हा अपुरा असल्यामुळे तो वाढवून मिळण्याबाबत आम्ही आमदार सुनिल शेळके यांच्याकडे मागणी केली होती. त्याचा प्रशासनाकडे व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आमदारांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. त्याबद्दल आम्ही आमदार शेळके तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया इंदोरीच्या शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
याबैठकीस अरविंद शेवकर, नंदकुमार ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच स्वप्निल शेवकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ ढोरे, संदीप शिंदे, रोहन शिंदे व रिंग रोड बाधित शेतकरी उपस्थित होते.