121 views
..
पुणे, दि. २० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील विविध आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील दौंड, शिरूर मंचर व भोर आगार तसेच बारामती कार्यशाळा येथे मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली. नैतिक मतदानाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना व मित्र परिवाराला मतदानाबाबत जागृत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमांचे आयोजन
'उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा' या मतदार जनजागृती मोहीमअंतर्गत खेड येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत समन्वय अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळूक व डॉ. प्रभाकर जगताप यांनी मार्गदर्शन केले. तसेच नैतिक मतदानाबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना जागृत करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. ही मोहिम उप विभागीय अधिकारी खेड जोगेंद्र कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.