976 views
..
तळेगाव दाभाडे, :- - तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत प्रवेश बंदी करण्याबाबत 24 तासांत निर्णय घेण्यात येईल, असे पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ही माहिती दिली. आमदार शेळके यांचे सहकारी गणेश थिटे, नारायण मालपोटे व गोकुळ किरवे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले. आमदार शेळके यांनी भ्रमणध्वनीद्वारे आयुक्तांशी चर्चा करून तळेगाव- चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची तातडीने दखल घेत पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात 24 तासात निर्णय घेण्याचे आश्वासन शेळके यांना दिले.
गेल्या आठवड्यात तळेगाव स्टेशन येथील चौकात संजय दिसले या व्यावसायिकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अवजड वाहनांच्या प्रचंड वाहतुकीमुळे तळेगावकरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याने चालणे व रस्ता ओलांडणे देखील जोखमीचे झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास तसेच चाकरमान्यांना ऑफिस किंवा कारखान्यात पोहोचण्यासही विलंब होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी 24 तासात याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
तळेगाव मार्गे चाकण एमआयडीसी कडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होत असलेले अपघात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात तळेगावकरांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या रस्त्यावर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. पाच महिन्यांपूर्वी कोणतीही जाहीर सूचना न देता ही बंदी शिथिल करण्यात आली. सकाळी नऊ ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात एवढ्या पुरतीच ही बंदी मर्यादित करण्यात आली. प्रत्यक्षात या कालावधीत देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे तळेगावकर नागरिक दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येने हैराण झाले आहेत.
*'रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर*
यावर्षी अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून ते तातडीने बुजवण्याबाबत आमदार शेळके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.