आजोबा मतदानाला यायचं हं!’…विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

92 views

....


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Thu Mar 21 2024

image

पुणे, दि.२१: ‘मतदान करा, मत ताकद आहे’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत शिरुर लोकसभा मतदारसंघातील निरगुडसर येथे ढोल ताशांच्या गजरात पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचले आणि ‘आजोबा मतदानाला यायचं हं!’ असे म्हणत त्यांना जागरुक नागरिक या नात्याने मतदान करण्याचे आवाहन केले. 


ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत. शिक्षक अभिनव संकल्पना राबवून विद्यार्थ्यांचे कलागुण आणि मतदान जागृतीचा सुरेख समन्वय साधताना दिसतात. मग वेगवेगळ्या प्रकारच्या ‘सेल्फी फ्रेम’, घोषवाक्यांचे रंगीत फलक तयार होऊन छान वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. 


विद्यार्थी केवळ मतदानाचे आवाहन करण्यावर थांबत नाहीत तर ‘होय मी मतदान करणार’ लिहिलेल्या ‘सेल्फी फ्रेम’मागे त्यांना उभे करीत नागरिकांचा छानसा फोटोही घेतात. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशाची भावी पिढी लोकशाही बळकट करण्यासाठी मोहिमेला निघालेली पाहून ग्रामस्थांकडूनही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शेटे, डॉ. शांताराम गावडे, अशोक कडलग, साहील शहा, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, नवनाथ थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले.


महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील जनजागृती उपक्रमात सहभागी झाले असून घोडेगाव येथील बी.डी.काळे महाविद्यालयात मतदान केंद्राची माहिती मिळविण्यासाठी क्यूआर कोड असलेले स्टिकर्स लावण्यात आले आणि मतदार यादीत नाव कसे पहावे याची माहिती विद्यार्थी आणि प्राध्यापकांना देण्यात आली.


*शिरुर पंचायत समिती येथे अंगणवाडी स्तरावर मतदान जनजागृती*


लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती शिरूरच्यावतीने अंगणवाडी स्तरावर दृकश्राव्य माध्यमाद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


 अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक ग्रामस्थ कार्यक्रमात सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रिया तसेच मतदान प्रक्रियेसंदर्भात उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

०००