स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

104 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 months ago
Date : Sun Feb 18 2024

image..



सातारा दि.१८-महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व येथील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई , आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. या दृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी ही प्रयत्न केले जात आहेत. शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन एक रुपयात पिक विमा अशा अनेक योजना राबवीत आहोत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेतला.


शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे असल्याने या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजे व त्याचे संवर्धनही केले पाहिजे.


महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात . ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढीसाठी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर,इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.