मतदान वाढीसाठी मावळात सहकार विभागाचा विशेष प्रयत्न

144 views


Author : Admin
Publisher : Admin
Update : 2 months ago
Date : Wed May 08 2024

image..



वडगाव मावळ : मावळ लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार असून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी सांगितले.


मावळ तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील शहरी व निमशहरी भागात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रथमच काही गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.



मावळ तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करून मतदानाची शपत देत आहेत.


गृहनिर्माण संस्थांमधील मतदान वाढीसाठी लेखापरीक्षकांची मदत घ्यावी. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान चिठ्ठी पोहोचविण्यास मदत करावी, मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तीपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत, सभासदांना मतदार यादीत नाव शोधून देणे, पात्र मतदारांची यादी तयार करुन मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करणे, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सर्जेराव कांदळकर यांनी सांगितले.